नऱ्हे: शहरातील नवले ब्रिज परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या नियमित ड्रंक अँड ड्राइव्ह तपासणी दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने थेट पोलिसांनाच दमदाटी करत आरडाओरड केली. यावेळी त्याने धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. नागरिकांनी या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याने घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शहरातील वाहतूक विभागाने नवले ब्रिज परिसरात मद्यधुंद वाहनचालकांविरोधात मोहीम राबवली होती. याच दरम्यान, एक दुचाकीस्वार संशयास्पद हालचाली करताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवले. त्याच्या श्वासात मद्याचा वास जाणवत असल्यामुळे पोलिसांनी त्याची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट केली. या चाचणीत संबंधित तरुण दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले. टेस्टचा अहवाल समोर येताच संबंधित तरुण आक्रमक झाला. त्याने आरडाओरड करत पोलिसांवर तोंडी दमदाटी केली. इतकेच नाही, तर चक्क वाहतूक पोलिसांचीच धरली गचांडी धरत काही वेळासाठी त्याने पोलिसांशी धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात हलवले.
या धक्कादायक प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. संबंधित व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या संयमाचे कौतुक केले असून, काहींनी अशा मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर सार्वजनिक सेवकास कामात अडथळा निर्माण केल्याचा, तसेच कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या तरुणाची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी असेही स्पष्ट केले आहे की, पुणे शहरात मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कारवाई अजून तीव्र करण्यात येणार आहे.