पुणे, १३ एप्रिल – धायरी भागातील ‘रिद्धी-सिद्धी पॅराडाईज’ सोसायटीत पार्किंगमधील अनधिकृत बांधकाम काढण्यावरून मोठा वाद झाला असून या प्रकरणात महिलांमध्ये जोरदार झटापट झाली. महिलांनी एकमेकींना धोधो मारहाण केली असून केस ओढण्याचे प्रकारही घडले. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सोसायटीतील सदस्य अनिल दरोली यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानंतर मल्लिका समीर पायगुडे गाजरे आणि समीर मनोहर पायगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल दरोली हे गेल्या १२ वर्षांपासून या सोसायटीत राहतात आणि सध्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या माहितीनुसार, एका फ्लॅटधारकाने पार्किंगमध्ये पत्रा लावून फॅब्रिकेशनचे अनधिकृत काम सुरू केले होते. संबंधित फ्लॅट आरोपींकडे भाड्याने दिला होता. सोसायटीने त्या बांधकामावर आक्षेप घेत नोटीस बजावली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवण्यात आले.
१३ एप्रिल रोजी सर्व सभासदांच्या संमतीने अनधिकृत बांधकाम काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी पोलिसांनीही पाहणी केली होती. बांधकाम काढण्याच्या वेळी आरोपी समीर पायगुडे यांनी "बांधकाम परत बांधून द्या" असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याच कारणावरून वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले.
या घटनेत महिलांनी एकमेकींना शिवीगाळ केली, केस ओढले आणि धक्काबुक्की झाली. राड्याचा व्हिडिओ काही रहिवाशांनी मोबाईलमध्ये टिपला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.