पुणे, १० एप्रिल – एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पुण्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवू लागली असून, शहर आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे कठीण बनले आहे.
लोहगावमध्ये तापमानाचा उच्चांक
बुधवारी लोहगाव येथे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर शिवाजीनगर येथे तापमान ४०.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सोमवारपासूनच शहरात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी हंगामातील उच्चांकी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जी नंतर आणखी वाढली.
उष्माघाताची लक्षणे ओळखा (Symptoms of Heat Stroke):
तीव्र डोकेदुखी
अशक्तपणा, चक्कर येणे
त्वचेला कोरडेपणा आणि गरमपणा
घाम न येणे
उलटी होणे किंवा मळमळ
श्वास घेण्यात अडचण
गोंधळ, चक्कर, किंवा शुद्ध हरपणे
या लक्षणांपैकी काहीही दिसल्यास त्वरित सावलीत/थंड ठिकाणी जावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उष्माघातापासून सुरक्षिततेचे उपाय, टाळण्यासाठी हे उपाय करा:
1. थेट उन्हात जाणे टाळासकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बाहेर जाणे शक्यतो टाळा. गरज असल्यास टोपी, गॉगल, स्कार्फ, छत्री यांचा वापर करा.
2. पाणी आणि द्रवपदार्थ भरपूर घ्या. दिवसातून वारंवार पाणी प्यावे – तहान लागली नाही तरीही.लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, फळांचे रस घ्यावेत.
3. सुटसुटीत, हलके कपडे परिधान करा. फिकट रंगाचे, सैलसर आणि सूती कपडे वापरा.
4. आहार हलका ठेवा. जड, तेलकट अन्न टाळा.फळे, कोशिंबीर, पातळ वरण-भात, ताक यांचा समावेश करा.
5. घरात थंडावा राखा, खिडक्या-दारे बंद ठेवून पडदे लावा.
पंखा/कुलर वापरा किंवा ओल्या फडक्याने अंग पुसा.
6. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या. त्यांना उकडलेल्या हवामानात बाहेर जाऊ देऊ नका.थंड ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा.
दुपारचे चटके असह्य
मंगळवारी आणि बुधवारी दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा अधिक जाणवू लागला. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अंगाची लाही लाही करणारा उकाडा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांनी टोप्या, स्कार्फ, गॉगल यांसारखी सुरक्षाकवचं वापरायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी पाण्याच्या बाटल्या, ओले रूमाल, व त्यावर शिडकाव यांचा वापर करताना दिसले.
रात्रीही उकाडा कायम
उन्हाळ्याचा त्रास फक्त दिवसभरापुरता मर्यादित न राहता रात्रीही उकाडा जाणवत आहे. हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे रात्रीची झोपही विस्कळीत होत असून अनेक नागरिक पंखे आणि कुलर असूनही घामाघूम अवस्थेत झोपत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता अशीच राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या काळात शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
उष्माघात व तापाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांनी नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. जास्त वेळ उन्हात राहणाऱ्यांनी शरीरात द्रवपदार्थांची कमतरता होऊ न देता नियमित पाणी, लिंबू सरबत, ताक इत्यादी घेत राहावे, तसेच शक्य असल्यास हलका आणि सैलसर कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात येत आहे.