पुणे – पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा अल्पवयीन वाहनचालकाच्या बेजबाबदार कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. वडगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये एका अल्पवयीन मुलाकडून भरधाव वेगाने रेंज रोव्हर चालवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत मुलाला ताब्यात घेतले असून, त्याचे वडील महेश प्रकाश बिडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात घडली. पोलीस शिपाई सचिन घोरपडे (मार्शल, कॉप्स २४) हे सहकाऱ्यांसह नियमित गस्त घालत असताना, त्यांनी रेंज रोव्हर गाडी प्रचंड वेगाने कॉलेजच्या आवारात धावताना पाहिली. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी त्वरित गाडी अडवली. गाडी चालवत असलेला मुलगा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यासोबत गाडीमध्ये आणखी दोन अल्पवयीन मुलेही उपस्थित होती. गाडीबाबत विचारणा केली असता, ती गाडी त्याच्या मृत आजोबांच्या नावावर असल्याचे आढळले. मात्र, गाडीचा वापर त्याचे वडील महेश बिडकर करत असल्याची माहिती पुढे आली.
ही माहिती मिळताच, पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. परंतु कायद्याच्या दृष्टीने हा गंभीर प्रकार असल्यामुळे मुलाच्या वडिलांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात "अल्पवयीन मुलाकडून वाहन चालवून घेणे", तसेच सार्वजनिक सुरक्षेला धोका पोहोचवणे यासारख्या गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
पुण्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या पोर्शे अपघात प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवले होते. त्यानंतरही काही पालक आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करत आहेत, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारे पॉश गाड्या चालवून घेतल्या जात असल्यास, भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी याप्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. वाहनांच्या देखभालीबरोबरच पालकांनी मुलांवर देखील योग्य नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे, असे नागरिकांमध्येही बोलले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना कायद्याचे पालन करणे, विशेषतः अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवू दिल्यास पालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.